संपादकीय
सेमीकंडक्टरच्या विश्वात
इटली येथे नुकत्याच पार पडलेल्या जी ७ राष्ट्रसमुहाच्या बैठकीदरम्यान जगभरातील सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा नष्ट करण्यासाठी परस्पर सहकार्याचा निर्णय घेण्यात आला. सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माला आणि त्याच्या वितरणाचे जाळे अधिक मजबूत करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. अर्धसंवाहक तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात नव्याने मुसंडी मारण्याची तयारी करीत असलेल्या भारतासारख्या देशांसाठी ही एक मोठीच आश्वस्त करणारी बाब आहे. योगायोगाने जागतिक पातळीवर या घडामोडी घडत असतानाच सृष्टीज्ञानचा सेमीकंडक्टर विशेषांक आपल्यासमोर सादर करण्यास आम्हाला आनंद होत आहे.
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश जोखडातून देश मुक्त झाला. त्याच वर्षी आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे ट्रान्झिस्टरचा शोध लागला. वीजरोहकता – म्हणजे ‘रेझिस्टन्स’ – उपकरणाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला स्थानांतरित – म्हणजे ट्रान्स्फर – करणारे यंत्र म्हणजे ‘ट्रान्झिस्टर’ अशी त्याची व्याख्या केली गेली. ट्रान्झिस्टर हा ही अर्धसंवाहकाचा – सेमीकन्डक्टर – एक प्रकार. त्यात विद्युतरोध नियंत्रित करून विद्युत प्रवाह नियंत्रित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे विद्युत वहनाचे नियंत्रण करून एनालॉग संदेशांचे डिजिटल रूपांतर करण्याची क्षमता मानवाला प्राप्त झाली. कृषी संस्कृतीतल्या मानवासाठी चाकाच्या शोधाचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व सध्याच्या डिजिटल संस्कृतीतील मानवासाठी या शोधाचे आहे. या शोधाने गेल्या ७६ वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली आहे. ट्रान्झिस्टरच्या शोधाला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारतीय स्वातंत्र्यालाही १०० वर्षे पूर्ण होतील. आणि तोवरच्या पुढच्या २३-२४ वर्षांत सेमीकंडक्टर क्षेत्रात जोरदार मुसंडी मारून तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रातली एक जागतिक महासत्ता म्हणून भारत मुसंडी मारू शकेल, अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ सध्या व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा विविध अंगांनी घेतलेला आढावा तुम्हाला या विशेषांकात वाचायला मिळेल.
परम महासंगणकाची निर्मिती करून अमेरिकी निर्बंधांपुढे भारत झुकत नाही, हे निर्विवादपणे जगाला दाखवून देणाऱ्या डॉ. विजय भटकर यांनी या क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर भारताला काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या अशा काही विषयांच्या शिक्षणाची व्यवस्था शालेय स्तरापासूनच व्हायला हवी, असे प्रतिपादन केले आहे. तर, होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी ते कसे शक्य होऊ शकते हे एका उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करून सांगितले आहे. इंटेलचे अमृतांशु नेरुरकर, समीरचे डॉ. अभय देशपांडे, प्राजचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर आणि फ्लेम विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. चैतन्य गिरी यांनी वेगवेगळ्या अंगांनी या विषयाचा वेध घेत भारताला या क्षेत्रात कशी संधी उपलब्ध आहे, याची मांडणी केली आहे.
त्या व्यतिरिक्त नेहमीची वाचकप्रिय सदरे आहेतच. तुम्हाला हा अंक कसा वाटला हे आवर्जून कळवा.
अंकाच्या स्वरुपात सुधारणा करताना तुमच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल.
संपादकीय २०२४
संपादकीय २०२३