आमच्याबद्दल

मातृभाषेतून विज्ञान प्रसार करून वैज्ञानिक शिक्षण आणि वैज्ञानिकदृष्ट्या सजग करून वाचनसंस्कृती देखील जोपासता येईल असे ९५ वर्ष सलगपणे प्रकशित होणारे विज्ञाननिष्ठ मासिक ‘सृष्टीज्ञान’

सृष्टिज्ञान ची पार्श्वभूमी:

‘सृष्टिज्ञान’, हे मराठीतील सर्वात जुने, ९६ वर्षे नियमित प्रसिद्ध होणारे व केवळ विज्ञानासाठी वाहून घेतलेले, एकमेव नियतकालिक (मासिक) आहे. जानेवारी १९२८ मध्ये मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. एक हजाराहून अधिक अंक सातत्याने निघणे  ही घटना मासिकांचे बाबतीत जागतिक स्तरावर नोंद घ्यावी, अशी मानली जाते. सृष्टिज्ञान ने १००० अंकांचा टप्पा १३ वर्षांपूर्वी पार केला आहे.

सृष्टिज्ञान सुरुवात:

सुमारे 97 वर्षांपूर्वी प्राध्यापक गो.रा. परांजपे हे जर्मनीमध्ये गेले होते. तेथे त्यांना असे आढळून आले की, जर्मन समाज अत्यंत पुढारलेला असून, समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. जर्मनीमध्ये जर्मन भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या विज्ञान विषयक मासिकांचे व नियतकालिकांचे प्रमाण फार मोठे आहे आणि त्यामुळे विज्ञानाची पाळेमुळे समाजामध्ये रुजलेली आहेत. तेव्हांच भारतात परतून, मातृभाषेतून म्हणजे मराठीतून, विज्ञान विषयक मासिक सुरू करून, महाराष्ट्रात विज्ञानाची पाळेमुळे रुजवावी, या विचाराने प्रेरित होऊन,  जानेवारी १९२८ साली त्यांनी सृष्टिज्ञान मासिक प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. त्यांना तत्कालीन समाज सुधारकांनी तात्काळ चांगला प्रतिसाद दिला. कै. प्रा. गो. रा. परांजपे यांसमवेत, कै. प्रा. दिनकर धोंडो कर्वे आणि कै. श्री.सत्यबोध बाळकृष्ण हुदलीकर इत्यादिंनी या मासिकाची स्थापना केली.

सृष्टिज्ञानची आवश्यकता:

मातृभाषेतून विज्ञान शिक्षण मिळण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी सृष्टीज्ञान प्रयत्न करित आहे. इंग्रजी माध्यमातून इंटरनेट द्वारा वैज्ञानिक माहितीचा मोठा खजिना उपलब्ध आहे. परंतु ते सर्व समजण्याची क्षमता सर्वांकडे असतेच असे नाही. विशेषतः वैज्ञानिक संकल्पना परकीय भाषेतून समजणे अवघड असते. मातृभाषा समजण्यास सोपी असते. मातृभाषेतून वैज्ञानिक संकल्पना सहजरित्या व चांगल्या पद्धतीने समजतात, राईट टू एज्युकेशन मध्ये, तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षणास महत्त्व दिले गेले आहे.

समाजातील अबाल वृद्धांमध्ये विज्ञानाची गोडी लागावी, शास्त्रीय माहिती सोप्या भाषेमध्ये उपलब्ध व्हावी आणि यायोगे देशातील प्रचलित शिक्षण पद्धतीस उत्कृष्ट पूरक व्यवस्था निर्माण करणे, हा सृष्टिज्ञान चा संकल्प आहे.

सृष्टिज्ञानचा प्रकाशन प्रवास:

मासिकाचे संपादन करण्यासाठी आजवर अनेक मान्यवर व्यक्तींनी वेळोवेळी मोलाचे योगदान केले असून, विशेष उल्लेखनीय व्यक्ती पुढील प्रमाणे  डॉ. वि.वा. नारळीकर, डॉ. भालचंद्र उदगावकर डॉ. वि.ना. भाजेकर, डॉ अ.मा.लेले, डॉ.गो.रा. केळकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ  मो.रा. चिपळूणकर, डॉ. वि.ना. गोखले, डॉ. निरंजन घाटे, डॉ. क.कृ.क्षीरसागर, प्रा. भालचंद्र उदगांवकर, प्रा. य. बा. राजे,  प्रा. प्र.वि. सोहनी, प्रा. प्र. रा.आवटी आणि प्रा. श्री. ल. आजरेकर व अन्य अनेक लोकांनी संपादन केले.

पुण्यातील सुप्रसिद्ध संस्था, आर्यभूषण मुद्रणालयकडे जानेवारी १९३३पासून, मासिकाचे मालकी हक्क सुमारे ४२ वर्षे होते. तत्पूर्वी बालोद्यान, मुद्रणालय, लक्ष्मीनारायण मुद्रणालय, गणेश महादेव आणि कंपनी, आदींकडून हस्तांतरित होत राहिले. जानेवारी १९७५  पासून मासिकाचे सर्वाधिकार महात्मा फुले वस्तू संग्रहालय घोले रोड पुणे यांचे कडे आले. सृष्टीज्ञान अखंडित प्रकाशित होण्याची परंपरा फुले संग्रहालयाने फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाळली आणि मार्च २०२३ पासून सृष्टिज्ञान चे मालकी हक्क विज्ञान भारती पुणे, या सेवाभावी संस्थेकडे आले आहेत.

विज्ञान भारती:

स्वदेशी विज्ञान चळवळ १९९१ मध्ये Indian Institute of Science (भारतीय विज्ञान संस्थान) बंगळूरू येथे प्राध्यापक के. आय. वासू यांच्या मार्गदर्शनाखाली काही शास्त्रज्ञांनी सुरु केली. या चळवळीने देशभरात वेग धरला आणि यातूनच विज्ञान भारती ची स्थापना झाली. विज्ञान भारतीची देशात २४ राज्यांत केंद्र असून ४ देशांत संपर्क केंद्र आहेत. स्वायत्त संस्था आणि खाजगी संस्थांच्या माध्यमांतून विज्ञान भारती ११ विविध क्षेत्रांत कार्य करत आहे.

विज्ञान भारतीचे पश्चिम महाराष्ट्र केंद्राचे पुणे येथे मुख्यालय आहे. डॉ. योगेश शौचे, प्रख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ याचे अध्यक्ष आहेत. आपल्या देशाचा वैज्ञानिक वारसा आणि वर्तमान जगातील वैज्ञानिक शोध यांचा सर्वसामान्यांना परिचय करून देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आणि इतर सामान्य जनतेसाठी वैज्ञानिक व्याख्याने आयोजित केले जातात. मार्च २०२३ पासून सृष्टीज्ञान मासिकाचे हक्क विज्ञान भारतीकडे आले आहेत. सृष्टीज्ञान मासिकाचा उद्देश आणि विज्ञान भारतीचे ध्येय समान असल्याने सृष्टीज्ञान मासिकाद्वारा विज्ञान प्रसार मराठीमधून महाराष्ट्रभर करावा या उद्देशाने विज्ञान भारती प्रयत्न करत आहे.

विज्ञान भारती विषयी अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: www.vibhaindia.org

प्रस्तावित प्रकल्प:

वर्तमानकाळात विद्यार्थ्यांमध्ये आणि एकंदरीत अवांतर पुस्तक वाचनाची सवय आणि आवड कमी होत जात आहे असे दिसून येते. विविध ग्रंथालये, मासिके यांचा वाचकवर्ग कमी होत जात असल्याचे निरीक्षण आहे. यासर्वामागे अनेक कारणे आढळतात. संपादकांच्या दृष्टीने मासिक चालवणे दिवसेंदिवस खर्चिक आणि तोट्यात आणणारे होत चालले आहे. तरी विशिष्ट उद्दिष्ट्पुर्तीकडे लक्ष ठेवून मासिकांचे अंक प्रकाशित केले जात आहेत.

विज्ञान भारती मार्च २०२३ पासून सृष्टीज्ञान प्रकाशनाचे काम करित आहे. वैज्ञानिक माहितीचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे या सामाईक हेतूने विज्ञान भारतीने सृष्टीज्ञान मासिकाचे काम आनंदाने स्वीकारले आहे. राज्यभरात मराठी भाषेमधून सर्वांपर्यंत वैज्ञानिक शोध, माहिती आणि शिक्षण पोहोचवणे या उद्देशाने या मासिकाचे प्रकाशन आणि वितरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

उद्दिष्ट्ये:

  • मातृभाषेतून विज्ञान प्रसार करणे,
  • विज्ञानातील कुतुहूल, जिज्ञासा जागृत करणे,
  • घडणाऱ्या घटनांची वैज्ञानिक माहिती, वैज्ञानिक कारणे लोकांपर्यंत पोहोचवणे,
  • ज्ञानाभावी निर्माण झालेल्या अंधश्रद्धा दूर करणे,
  • वैज्ञानिक ज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करणे,
  • याद्वारे वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे,
  • नवीन तंत्रज्ञानाद्वारे e-मासिक जगभरात उपलब्ध करून देणे,
  • नवीन तंत्रज्ञानाद्वारे e-मासिक विद्यार्थ्यांना, युवकांना वाचन प्रवृत्त करणे,
  • जुन्या अंकांचे डिजीटायझेशन करून सर्वांसाठी e-अंक उपलब्ध करून देणे.

मासिकाचा तपशील:

मासिक सुमारे ३५ पृष्ठांचे आहे. प्रत्येक अंकांत विस्तारानुसार साधारण विविध लेखकांचे ८ (आठ) लेख असतात. प्रत्येक अंक विज्ञान शाखेतील एखाद्या विषयाला समर्पित असतो आणि त्या विषयानुरूप विविध लेख लेखकांकडून मागवले जातात. हे लेख त्या अंकात छापले जातात. वितरण व्यवस्थेमध्ये पारंपारिक वितरण पद्धती सध्या वापरली जात आहे. भारतीय पोस्ट सेवेमार्फत सभासद वाचकांना त्यांच्या नोंदीकृत पत्त्यावर पाठवला जातो. वाचक सभासद होण्यासाठी वार्षिक शुल्क वाचकांकडून आकारले जाते. या शुल्कामध्ये मासिक शुल्क आणि वितरण शुल्क अंतर्भूत आहे. यात वार्षिक सभासदत्व दिले जाते.

ऑनलाईन साहित्य: आता युवक वर्ग मोबाईल, संगणक, इंटरनेट आदी आधुनिक उपकरणे आणि सुविधांचा वापर करत आहे. या नवीन माध्यमांतून उपलब्ध होणाऱ्या साहित्याकडे वळत आहेत. अनेक साहित्य आता ऑनलाईन स्वरुपात देखील उपलब्ध होत आहे, आणि त्याचा वाचकांना तुलनेने खर्च कमी येतो, कधीही, कुठेही वाचता येते आणि प्रत्यक्षात पुस्तके सोबत बाळगावी लागत नसल्याने मुख्यतः ओझेही होत नाही. याचा विचार करूनच विज्ञान भारती सुद्धा आपल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याचे आधुनिकीकरण करत आहे.

याचाच भाग म्हणून सृष्टीज्ञान मासिकाचा देखील ऑनलाईन अंक यापुढे प्रकाशित करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑनलाईन अंकासोबतच मागील अंकांचे डिजीटायझेशन करणे असाही प्रस्ताव आहे.

सृष्टीज्ञान संपर्क :

संपादक : श्री. रमेश दाते

पत्ता: ‘सृष्टीज्ञान’ C/O विज्ञान भारती, काशी निवास,

१२६१, शुक्रवार पेठ, वाडिया हॉस्पिटल समोर,

सुभाष नगर, गल्ली क्रमांक ६, पुणे – ४११००२

भ्रमणभाष: ९४२२४ ०७२६२

इमेल : sci.vibha@gmail.com